Wednesday, February 9, 2011

वासंतिक वमन



मित्रांनो वसंत ऋतुची चाहुल लागली आहे. थंडी कमी होऊन उष्णता वाढत आहे. प्रसन्न वातावरण आहे. आंब्याला आलेला मोहोर, कोकिलकुजन ही वसंताची पाऊले आहेत. श्रीकृष्णांनी वसंत हा सर्वश्रेष्ठ ऋतु सांगितला आहे. वसंत हा नवनिर्मितीचा निर्देशक आहे.
     आयुर्वेदानुसार वसंत हा कफप्रकोपाचा काळ आहे. आधीच्या शीत ऋतुमध्ये कफ शरीरात साठुन राहतो. वसंतात वाढलेल्या उष्णतेमुळे कफ वितळण्यास सुरुवात होते. या कफामुळे सर्दी खोकला दमा इ. व्याधी होतात.
     वमन हे आयुर्वेदोक्त पंचकर्म या ऋतुमध्ये करावे. वमन या पंचकर्मात सुरुवातिला रुग्णास ४-६ दिवस औषधी युक्त तुप पिण्यास दिले जाते. त्यानंतर एक दिवसाच्या अंतराने रुग्णास वमन दिले जाते.
   वमनाच्या दिवशी रुग्णास सकाळी लवकर सर्वांग स्नेहन स्वेदन करतात. त्यानंतर रुग्णास औषध (ज्या द्वारे उलटी होइल ) दिले जाते. थोड्या वेळाने दुध, उसाचा रस, जेष्ठमधाचा काढा यापैकी एखादे द्रव्य पोटभर पिण्यास सांगतात. रुग्णास उलटी होण्यास सुरुवात होते. उलटी द्वारे शरीरातील विकृत कफ व पित्त बाहेर पडते.
       ४- ८ उलटी झाल्यावर ही प्रक्रिया थांबवतात. रुग्णास दिवसभर आराम करण्यास सांगितले जाते.
रुग्णास हलका पथ्यकर आहार सांगितला जातो.
वमनाचे फायदे -
  • शरीरातील विकृत कफ पित्त बाहेर पडते.
  • कफाचे विकार सर्दी. दमा इ. कायम स्वरुपी कमी होतात.
  • अम्लपित्त इ. पचनाचे विकार ही कमी होतात.
  • स्थौल्य मध्ये फायदा होतो
  • शरीर हलके होते.
  • त्वचा सुंदर होते.
  • पिंपल्स कमी होतात.
म्हणुन या वसंतात सर्वांनी जरुर वमन करुन घ्यावे.

No comments:

Post a Comment